(पिंपरी, प्रतिनिधी):पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. (दत्तात्रय यशवंतराव) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांवर उपचार घेत (Dr. D. Y. Patil)होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत देशभरात शैक्षणिक संस्थांचे विस्तृत जाळे उभारले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, क्रीडा तसेच इतर उच्च शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
राजकीय आणि सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून कार्य केल्यानंतर त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. शिक्षण, सामाजिक विकास, लोकसेवा आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे त्यांना देशभरात विशेष मान्यता आणि आदर प्राप्त झाला.
त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली (Dr. D. Y. Patil)आहे.
