पिंपरी, दि. २८ जून : कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले.
चांडोली (ता. खेड) येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक ज्ञानेश्वर मारुती मरगज यांच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी झाल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत खेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तातडीने तपास सुरू करून अल्पावधीतच आरोपीला जेरबंद केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे आणि कार्याध्यक्ष दीपक कलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे, सचिव अरुण काळे, कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब घोमाल, इरफान पठाण, देवदत्त रावल तसेच अन्य सभासद यावेळी उपस्थित होते.
या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद क्षीरसागर, पोलीस हवालदार संतोष घोलप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबदे, पोलीस हवालदार अतुल डेरे, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर आणि स्वप्नील गाढवे यांनी तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केली.
यावेळी बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले की, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि बस वाहतूकदारांच्या अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यापुढेही योग्य सन्मान केला जाईल.
