(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाजसेवेची प्रेरणा दृढ करण्याचा पवित्र दिवस. या पर्वाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष, पिंपरी-चिंचवडचे संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, क्रांतिवीर चापेकर स्मारक आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयाच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून (Moreshwar Shedge Birthday)दिला.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संकुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे येथील विद्यार्थी, विद्यालय आणि गोशाळेला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर ॲड. शेडगे यांनी विद्यार्थी संकुलासाठी ५१ हजार रुपये आणि विद्यालयासाठी ५१ हजार रुपये, अशी एकूण एक लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली. याशिवाय गोशाळेसाठी एक टन चाऱ्याचीही मदत उपलब्ध करून दिली.
चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात ही देणगी पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना ॲड. मोरेश्वर शेडगे म्हणाले, “गुरुंचे आशीर्वाद आणि समाजसेवेची प्रेरणा हीच खरी संपत्ती आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा संकल्प केला होता. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गुरुचरणी कृतज्ञतेची ही छोटीशी अर्पणभावना व्यक्त करता आली, याचे मनस्वी समाधान वाटते.”
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकास घडविण्यासाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, त्या कार्याला हातभार लावण्याचा संकल्प ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्यक्ष कृतीतून साकारला.
दरम्यान, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम परिवाराच्या वतीने ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान स्वीकारताना त्यांनी तो समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे विभाग संघटन मंत्री प्रतीक पावडे, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे, ‘ब’ प्रभाग समितीचे अध्यक्ष मंदार देशपांडे, सामाजिक समरसता साहित्य परिषदेच्या शोभाताई जोशी, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका चंद्रकलाताई शेडगे, भाजप राज्य परिषदेचे सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार मुरडे, रवींद्रजी देशपांडे, भाजप सरचिटणीस मधुकर बच्चे, राजाभाऊ मासुळकर, अजित कुलथे, दत्ताभाऊ चिंचवडे, कैलासभाऊ सानप, नंदूकाका भोगले, सचिन शिवले, गोपाळ काका भसे, वसंत गुजर, श्रीकांत जोशी, गणेश ढाकणे, अमर कापसे, खंडूदेव कठारे, मनोज तोरडमल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत समाजकार्यासाठी समर्पणाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

प्रतिक्रिया
“गुरु हे केवळ ज्ञानाचे दाते नसून समाजसेवा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत. माझ्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी योगदान देण्याचा संकल्प मी केला होता. गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संस्काराच्या कार्यात खारीचा वाटा उचलता आला, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे; त्याचे ऋण अशा विधायक कार्यातून फेडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न (Moreshwar Shedge Birthday)आहे.”
– ॲड. मोरेश्वर शेडगे
संघटन सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड
