प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, सल्लागार आणि काही नगरसेवकांनी संगनमत करून उपसूचना वाढ-घट प्रक्रियेत कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांकडे स्वतंत्र निवेदने देत सखोल चौकशी व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली (PCMC scam)आहे.
भापकर यांच्या आरोपानुसार, सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक मंजूर व ‘लॉक’ झाल्यानंतरही २० उपसूचनांद्वारे पाणीपुरवठा, बीआरटीएस, रस्ते आदी ७० ते ८० कामांसाठी २९ ते ३१ मार्चदरम्यान सुमारे ६० कोटी १८ लाख रुपयांची बिले ठेकेदारांना अदा करण्यात आली. यामध्ये लेखा विभागातील अधिकारी, अभियंते, ठेकेदार व काही नगरसेवकांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला(PCMC scam) आहे.
या प्रकरणी आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात २० पैकी १७ उपसूचना अवैध असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्याआधारे ६०.१८ कोटींची बिले अदा झाल्याचे समोर आले आहे. तसेच महापालिकेच्या सुमारे १८०० कोटी रुपयांच्या ठेवींच्या व्यवस्थापनातही अनियमितता झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला (PCMC scam)आहे.
या संपूर्ण प्रकरणातील संबंधित अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक व अन्य जबाबदारांवर कठोर प्रशासकीय कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जनआंदोलन व न्यायालयीन लढा उभारला जाईल, असा इशारा भापकर यांनी दिला (PCMC scam) आहे.
