(पिंपरी, दि. ६ सप्टेंबर २०२६) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिलासा साहित्य सेवा संघ आणि ओम साई ट्रॅव्हल्स यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक पांडेश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या हस्ते शिक्षकांना शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार होते. यावेळी दिलासा समूहाचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, प्रकाश घोरपडे, विलास कुंभार आणि संगीता जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी योगिता कोठेकर (त्रिवेणीनगर), शामला पंडित दीक्षित (रावेत), अंबादास रोडे (थेरगाव), सुभाष चटणे (चिंचवडगाव), तानाजी एकोंडे (काळेवाडी), भाऊसाहेब गायकवाड (त्रिवेणीनगर), बाळकृष्ण अमृतकर (रहाटणी) आणि अरुण चव्हाण (रहाटणी) या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
अण्णा जोगदंड म्हणाले, “मोबाइल आणि इंटरनेटच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासक्रम शिकविण्याबरोबरच त्यांच्या मनात संस्कारांची शिदोरी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत आहेत. या गुरुजनांना वंदन करताना अत्यानंद होत आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण कुंभार म्हणाले, “कुंभार जसे मडके घडवतो, तसे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवीत असतात. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याची आज खरी गरज आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलासा समूहाचे शामराव सरकाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले, तर आभार मुरलीधर दळवी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीरा कंक, दैवता घोरपडे, हिरामण देवरे, सुरेश चव्हाण, उज्ज्वला पवार आणि सुनंदा अमृतकर यांनी संयोजन केले.
