(पिंपरी, प्रतिनिधी):आशीर्वादाच्या बहाण्याने सोन्याची अंगठी लंपास; चिखलीत अनोळखी साधूकडून फसवणूक
पिंपरी : आशीर्वाद देऊन भरभराट आणि सुख-समाधान मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनोळखी साधूने एका व्यक्तीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना मोरवाडी ते पूर्णानगरदरम्यान घडली. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसलेल्या साधूने विश्वास संपादन करून ही फसवणूक केली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अभिजीत रामचंद्र पाटील (वय ४९, रा. अक्षय चंदन सोसायटी, बेलठिकानगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी साधूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाएकच्या सुमारास पाटील हे कारमधून मोरवाडी येथून पूर्णानगरमार्गे चिंचवडकडे जात होते. त्यावेळी एका साधूने लिफ्ट मागितल्याने त्यांनी त्याला कारमध्ये घेतले. आपण नागा साधू असल्याचे सांगत आशीर्वादामुळे भरभराट आणि सुख-समाधान मिळेल, असे सांगून त्याने पाटील यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर साधूने पाटील यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. अंगठी डोळ्यांना लावून ती कारमधील गिअरजवळ ठेवत असल्याचे भासवले. मात्र, अंगठी गिअरजवळ न ठेवता स्वतःकडे ठेवून साधूने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
संशयित साधू जाड अंगाचा, सुमारे साडेपाच फूट उंच आणि काळासावळ्या रंगाचा आहे. त्याने भगवे वस्त्र परिधान केले होते. तो हिंदी भाषेत बोलत असून डोक्यावर फेटा आणि हातात मोठे कडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वर्णनाच्या आधारे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
‘मला ओळख का देत नाहीस?’ म्हणत तरुणाला मारहाण; लोखंडी रॉड फिरवत दहशत
पिंपरी : ‘मला ओळख का देत नाहीस?’ असे म्हणत १९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून त्याच्या मित्रांसह मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी रॉड हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रुपीनगर, तळवडे येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
______________________________________________________
या प्रकरणी अनिकेत सचिन वाकळे (वय १९, रा. हनुमान हाउसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. मनमीत सिंग (रा. संग्रामनगर झोपडपट्टी, यमुनानगर) आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वाकळे हे रुपीनगर भाजी मंडई परिसरातील रॉयल मेन्स वेअर या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी मनमीत सिंग तेथे आला आणि ‘मला ओळख का देत नाहीस?’ असे म्हणत वाकळे यांना शिवीगाळ करू लागला.
वाकळे यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केल्यानंतर आरोपी दुकानाबाहेर गेला. काही वेळाने तो तीन साथीदारांसह परत आला. त्यांनी वाकळे यांना दुकानाबाहेर बोलावून घेत शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, नागरिक भांडण सोडविण्यासाठी पुढे येत असताना आरोपीने लोखंडी रॉड हवेत फिरवत दहशत निर्माण केली. त्यानंतर वाकळे यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर आणि पाठीवर रॉडने मारहाण करण्यात आली. साथीदारांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.
वाल्हेकरवाडीत घरासमोरून ॲक्टिव्हा चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
पिंपरी : घराबाहेर पार्क केलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेश प्रल्हाद बराटे (वय ५३, रा. चिंतामणी कॉलनी, लेन क्रमांक २, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बराटे यांनी त्यांची होंडा ॲक्टिव्हा (क्रमांक एमएच १४ एफबी ६१२६) घराबाहेर पार्क केली होती. २२ ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ ते २३ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली.
सकाळी दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बराटे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
बंदी आदेशाचे उल्लंघन; खालुंब्रेत लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा
पिंपरी : शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही लोखंडी कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालुंब्रे येथील मोकळ्या शेतजमिनीवर रविवारी (२३ ऑगस्ट) रात्री ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी केशव रावसाहेब चेपटे यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत तानाजी रोहीले (वय १९, रा. खालुंब्रे, मूळ रा. कासारशिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास खालुंब्रे येथील वाघीरे यांच्या मालकीच्या मोकळ्या शेतजमिनीच्या परिसरात प्रशांत रोहीले हा लोखंडी कोयता बाळगून आढळून आला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे व हत्यारे बाळगण्यासंदर्भात १७ ऑगस्ट रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश १७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ३० ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहीले याच्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
———-_-_——————–_———-=========
५० हजारांची लोखंडी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक; किवळेत पोलिसांची कारवाई
पिंपरी : कोणताही परवाना नसताना सुमारे ५० हजार रुपये किमतीची लोखंडी पिस्तूल बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. किवळे येथील आदर्शनगर परिसरात रविवारी (२३ ऑगस्ट) रात्री ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस शिपाई निलेश किसन जाधव यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य कैलास कदम (वय २०, रा. तुगाव, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास आदर्शनगर, शिवनेरी कॉलनी परिसरातील एका नवीन बांधकामाच्या ठिकाणी आदित्य कदम हा आढळून आला. त्याच्याकडे सुमारे ५० हजार रुपये किमतीची लोखंडी पिस्तूल होती.
पिस्तूल बाळगण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रे, बंदुका तसेच इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करून पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
