(पिंपरी, प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार Rohit Pawar यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येऊन प्रशासनावर जोरदार टीका केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ती होऊ न शकल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर (Waste to Energy Accident)केले.
या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी करत त्यांनी महापालिका प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली होती. या भीषण दुर्घटनेत नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत महापालिका आयुक्तांनी मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडल्याचे म्हटले होते. मात्र, या दाव्याला विरोध करत आमदार रोहित पवार म्हणाले, “ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडलेली मानवनिर्मित दुर्घटना आहे.”
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, पर्यावरण विभागातील अधिकारी, प्रकल्पाची देखरेख करणारे अधिकारी तसेच वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या दुर्घटनेस थेट जबाबदार आहेत. नैसर्गिक आपत्तीचा आधार घेऊन दोषींना निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न होऊ नये. प्रत्येक जबाबदार व्यक्तीवर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.
या प्रकरणात पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, केवळ निलंबन ही अपुरी कारवाई असून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
तीन मजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी संबंधित कंपनीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, मृतांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी, वारसदारांना महापालिकेत नोकरी द्यावी तसेच स्वतःचे घर नसलेल्या कुटुंबांना शासनाच्या योजनेंतर्गत तातडीने घर उपलब्ध करून द्यावे, अशाही मागण्या त्यांनी केल्या.
यावेळी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत रोहित पवार म्हणाले, “प्रशासन संबंधित ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या दुर्घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू देणार नाही.”
शेवटी त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले, “आजपासून दहा दिवसांच्या आत दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात (Waste to Energy Accident)येईल.”
