(पिंपरी ):पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पिंपरी येथील बी. टी. अडवाणी धर्मशाळेत १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. हेमदेव थापर उपस्थित होते.
डॉ. थापर यांनी भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना सांगितले की, “१९३० साली इंग्लंडमध्ये झालेल्या एका परिषदेत भारताला स्वातंत्र्य देताना मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र देशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर फाळणीची चर्चा पुढे आली. १९३७ मध्ये मुस्लिम लीगने स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा प्रचार सुरू केला. पुढे १९४७ मध्ये फाळणीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप मिळाले आणि १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले.”

स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलीनीकरणाची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी अनेक संस्थाने भारतात विलीन करून घेतली. मात्र, जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेवर डॉ. थापर यांनी टीका केली.
“काश्मीरला विशेष दर्जा देण्यासाठी तत्कालीन सरकारने केलेल्या निर्णयामुळे वेगळे निशाण, वेगळे संविधान आणि स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाली. भारतीय जनता पक्षाची दीर्घकाळची मागणी असलेले संविधानातील कलम ३७० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने रद्द केले. त्यामुळे त्या निर्णयाला पूर्णविराम मिळाला,” असे डॉ. थापर म्हणाले.

सभेला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, हर घर तिरंगा अभियानाचे प्रदेश सहसंयोजक अनुप मोरे, जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, गटनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती उषा वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे संयोजन अॅड. नानिक पंजाबी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, ज्योतीका मलकानी आणि आतम प्रकाश मताई यांनी केले. सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सभेचे प्रास्ताविक अॅड. नानिक पंजाबी यांनी केले. सूत्रसंचालन भाजप संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांनी आभार मानले.
