पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर या जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावी, तसेच मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे कॉरिडॉर आणि चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतिशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल उभारावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर डॉ. कोल्हे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर मार्गाला असलेल्या जनसमर्थनाची माहिती दिली. अनेक प्रकल्पांना विरोध होत असताना या रेल्वेमार्गासाठी जनआंदोलन होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देत जुन्याच मार्गाने प्रकल्प राबविण्याची आग्रही मागणी केली.
यावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीच्या अहवालावर पुढील निर्णय अवलंबून असल्याचे सांगितले. समितीचा अहवाल सकारात्मक येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, न्हावाशेवा बंदराला जोडणारा उरण-तळेगाव-चाकण-संभाजीनगर असा मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली. या मार्गामुळे तळेगाव, चाकण, रांजणगाव आणि संभाजीनगर परिसरातील औद्योगिक वसाहतींना कच्चा माल आणि उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठी स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होईल. सध्या मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून असल्याने वाहतूक कोंडी, वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतिशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल उभारल्यास औद्योगिक तसेच शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळून परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
“चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतिशक्ती टर्मिनल उभारल्यास औद्योगिक तसेच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी स्वस्त आणि जलद पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे परिसरातील सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही अंशी सुटण्यास मदत होईल.”
